हे असं का होतं ( कविता )

हे असं का होतं ?

उगाच मन खट्टू होऊन बसतं
राग नसतो, रुसवा नसतो
असले अंतर भेटीतले तरी
मनाचं पाखरू उडू लागतं
फांदी फांदी शोधू लागतं
हे असं का होतं ?

दरवाजावर टक टक करतं
तुझ्या पावलांची चाहूल घेतं
कडी उघडण्याचा आवाज ऐकतं
किलकिल्या डोळ्यांनी फटीत बघतं
चेंगरल्या पंखांनी टवकारू लागतं
हे असं का होतं ?

दार उघडतं, आणि बंद होतं,
चिमुरडं उर धडधडून  उठतं
चौकट सोडून खिडकीत जातं
तावदान, हलकड्या आपटू लागतं
चोचीचा आ वासून हुंदडत रहातं
हे असं का होतं ?

पंख आपटतं, चोच घासत
व्याकुळ, हळवं  खूप आसुसतं
उठता बसता घिरट्या घालतं
खोल खोल काळजाचा ठाव घेतं
उलघाल करीत माणूस शोधतं
हे असं का होत ?

त्याचं शिवार , त्याचं माळरान
सारंच सैरभैर, सारंच हैराण.
नुसती तगमग, रणरण भयाण
उठता बसता, कोलमडू लागतं
दे माय धरणी ठाय म्हणतं
हे असं का होतं ?


तुझ्या घरट्यात शिरू पहातं
कट्टीबट्टी धरू लागतं
थोडं हट्टी, थोडं अवखळ
तुझा आडोसा शोधू लागतं
ओक्साबोक्शी रडू लागतं
हे असं का होतं ?

 जयवंत.
( २१/०६/२०२०)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुजनहो गतिमान होऊया !

तिन्ही सांजेला कविता