मी आणि मुंबई मराठी पत्रकार संघ

                 .... आणि मी मुंबई मराठी पत्रकार संघात पोहचलो.

                   मे कि जून नेमकं आठवत नाही , परंतु त्याच महिन्यांच्या  दरम्यान १९९७ सालची ही गोष्ट.  एम.ए. इंग्रजी ची परीक्षा पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून दिल्यानंतर पुढे नक्की काय करायचं, कुठे जायचं हा एक मनातल्या मनात छळणारा प्रश्न होता. वडील पोस्टात पॅॅकर म्हणून पंचवीस वर्ष सेवा करून १९९५  ला निवृत्त झाले होते. त्याकाळी केंद्र सरकारी कर्मचार्यांना जेमतेम घर चालेल इतकाच पगार असायचा. त्या तुलनेत पेन्शन तर निम्म्याहून कमी मिळायची. वडीलांना सुमारे सतराशे रुपये मिळत होती. त्यात मागून शिकत येणारा धाकटा  भाऊ अविनाश , मी, आई, दीड एकर शेती अस छोट कुटुंब अत्यल्प पैशातही आनंदाने चालत होत. त्या आधी पाच वर्षांपूर्वी थोरली बहिण ज्योत्स्नाचा विवाह झाला होता. तिच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसेबसे फिटत आले होते. नेवाशाच्या छोट्याशा खरवंडी नामक गावातून आलेला मी ,१९९३ला बारावी नंतर शिक्षणासाठी घर सोडलेलं. वडिलोपार्जित करावा असा ना व्यवसाय होता ना पुरेशी शेती. पुढे शिकायचं, बरच काही करायचं डोक्यात होत पण वाट सुचेना म्हणून वाट लागायची वेळ होती. 
                      चाकण जवळच्या शिवे गावातील चिंतामण रामचंद्र शिवेकर,या वाडियन मित्राच्या सोबतीने लग्नाच्या वऱ्हाडाच्या ट्रकने  वर्सोवा अंधेरी गाठून मुंबई विद्यापीठाचे बी एड चे फॉर्म भरणे एवढच खिशातील पैशांच्या सल्ल्याने शक्य होत. बारावी नंतर डी एड साठी सलग तीन वर्ष सुमारे तेरा जिल्ह्यांचे स्वकष्टाने कमावलेल्या पैशांत फाॅॅर्म्स  भरूनही  नंबर न लागल्याने आपण शिक्षक होऊ शकतो हे तात्पुरते स्वप्न भंगलेले होते. बीएड ला प्रवेश मिळण्यासाठी केलेला तो अंतिम प्रयत्न ठरणार होता. अन्यथा लॉ किंवा जर्नालिझम हे दोनच रस्ते जोरदार खुणावत होते. कस्सून अभ्यासाची चांगलीच सवय पुण्याने लावली होती. सोबतीला वाघीणीच दुध ' इंग्रजी ' होत. खिशात पैसा कमी, आत्मविश्वासच जादा होता. त्याला चिंतामण या एका पठ्ठ्याने दिलेली साथ कधीच न विसरता येणारी होती. पहिलं मुंबई दर्शन आणि स्वप्ननगरी मुंबापुरीच  रुपडे त्यानेच दाखविले.  कसाबसा तो जून ढकलला. बी एड्ची यादी लागली आणि नंबरही लागला. मेट्रो सिनेमासामोरचे गव्हर्मेंट बीएड काॅॅलेज अर्थात सेकंडरी ट्रेनिग कॉलेजला.  कॉलेज आणि अभ्यास वेगाने सुरु झाला. मात्र राहण्याचा ठावठिकाणा नव्हता. शेवटी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅॅँम्पस होस्टेलमध्ये राहणाऱ्या निवृत्ती चांगदेव सोनावणे या बीएच्या मित्राच्या रूमवर चोरून सुमारे पंधरा वीस दिवस भूमिगत होऊन काढले. मुंबईत आल्यावर अफलातून केलेले ते पहिलेवहिले डेअरिंंग चपखल यशस्वी झालं होत. आमचा एन सी  सोनावणे म्हणजे कमालीचा पापभिरू माणूस, एकदम नियमबद्ध आणि नाकासमोर चालणारा. पण न जाणो त्या वीसएक दिवसांच्या काळात त्याच्यामध्ये कुठूनतरी दहा हजार हत्तींच बळ माझ्यापाठीशी उभे राहताना आले होते.
                   होस्टेल मिळेपर्यंत सातबंगला वर्सोवा अंधेरी ते व्ही टी हा लोकलचा प्रवास पोटात गोळा आणायचा. व्ही टी स्टेशनला मोकळा श्वास मिळाला कि बाहेर पडताना स्टेशन, महानगरपालिका आणि आजूबाजूच्या कधीकाळी फक्त चित्रपटात पाहिलेल्या ब्रिटीशकालीन ऐतिहासिक वास्तू, पुतळे, टॅॅक्सी आणि बसेस, लोकांची भाऊगर्दी, मुंबईच्या राहाणीमानाचा सगळा माहोल आणि लहेजा , नकळत छाती फुगवून जायचा. महापालिका मार्गावरून आझादमैदान आणि खाऊगल्ली ही हमखास नजर वळविणारी ठिकाणे होती. तिथ होणारी आंदोलने, राजकीय लोकांची अचानक दर्शने, सततचा बंदोबस्त, चित्रपटांचे शुटींग, टीव्ही चॅॅनल्सच्या ओबी व्हॅॅन्स पाहून मनात कायमची खळबळ माजायची. दोन पाऊले पुढे चालून गेले कि सहज लक्ष जायचं ते  तिरकस पाठ वळवून एका गेटमधून डोकावणाऱ्या फलकावर -' मुंबई मराठी पत्रकार संघ. '
                  बीएडमुळे एक वर्षाच्या करिअरचा प्रश्न तूर्तास थंडावला होता. पण नंतर काय हे विचार स्वस्थ बसू देत नव्हतेच.  मग बीएड सोबत आणखी काही करू शकतो का ? या प्रश्नाने डोकंं वर काढायला सुरुवात केली. सिड्न्हॅॅम कॉलेजच्या मागील बाजूस बी रोडवरील शासकीय मुलांचे वसतिगृह मिळाले आणि राहण्याचा प्रश्न मिटला. बीएडचे लेसन्स जोरात सुरु झाले. बोलता बोलता बीएड कधी संपत आले कळालेच नाही. निरोपापूर्वी कॉलेजमध्ये एक मिसेलिनिअस नावाची स्मरणिका प्रकाशित केली जाई. त्यातल्या माझ्या 'अखेरचा हा तुला दंडवत ' या  लेखाला  एसटी कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय श.य. चिखलीकर सर, श्रीमती मेश्राम मॅॅडम, श्रीमती. मुग्धा प्रभाकर सांगेलकर  मॅॅडम आदि गुरुजनांनी भरभरून दाद दिली. मी लिहिलेला आणि  छापला  गेलेला तो पहिला लेख आणि ती दाद लिखाणाची स्पुर्ती देऊन गेला. 
                 वर्ष संपत आले होते. परीक्षा तोंडावर आलेल्या. त्यानंतर मिळालेले होस्टेल सुटणार होते , नुकतीच दिसलेली शिक्षकी पेशाची वाट, मुंबईचा लागलेला लळा. गावी जावून काय करणार त्यापेक्षा इथेच राहून हातपाय हलविण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. त्या भांबावलेल्या अवस्थेत दोन संस्थांनी डोक्यात हादरे द्यायला सुरुवात केली होती. एसटी कॉलेजच्या बाजूलाच असलेली आयव्हीजीएस या संस्थेचा समुपदेशन पदविका अभ्यासक्रम आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा पत्रकारितेचा अभ्यासक्रम.पण मुळात आपला जिथे राहण्याचाच ठावठिकाणा नाही तर ते करता येणे अशक्यच  होते. तशी त्याला इतरही कारणे होती. समुपदेशनाचा अभ्यासक्रमाला पाच वर्ष अनुभव असणारे फक्त पर्मनंट शिक्षकच  प्रवेश घेऊ शकत. त्यामुळे अजून बीएडच पूर्ण नाही , मग शिक्षक म्हणून नोकरी मिळणे, नियमित होणे, नंतर पाच वर्ष असे सगळे ते चित्र धूसर झाले. पत्रकारितेचे खूळखुळतच राहिले. मुंबईतच कि पुन्हा गावाकडे बॅॅक टू पॅॅव्हेलीयन अशी विवंचना होती.
                    अशा अगम्य काळात धावून आलेला माझा जिवलग मित्र चंद्रकांत पाटील याने '' तूला गावी जाऊच देणार नाही, माझा क्लास काढण्याचा विचार आहे आणि मला तू त्यात इंग्रजी शिकवायला हवा आहेस. तो संध्याकाळी असेल. तू दिवसा एखादी शाळा करायची,संध्याकाळी क्लास. मग दोघेही  दिसली जाहिरात कि कर अर्ज असा धडाका सुरु केला. ठाण्याजवळच्या मानपाड्यात  दोघांचीही निवड झाली. पण तिथे जेमतेम दोन दिवस शिकविले. तोपर्यंत ठाण्यातीलच शेठ बबनराव पडवळ विद्यालयात मला १८०० रुपये एकत्रित पगाराची शिक्षक म्हणून संधी मिळाली. पुढे चंद्रकांतने क्लासवरच लक्ष्य केंद्रित करायचे ठरविले. गणित विज्ञानात आणि विद्यार्थीप्रियतेत तो आजतागायत अतिशय नावाजलेलाच राहिला. मी मात्र सहासात महिन्यातच कुर्ल्याच्या गांधी बाल मंदिर  हायस्कूलच्या वीस वर्षांच्या अखंड सेवेचा सेवेकरी झालो. ही शाळा आणि माझे शिक्षक सहकारी हेच माझे टर्निंग पॉईंंट ठरले. जेजे नवीन ते सगळच शिकण्याची  इथल्या प्रत्येकाला प्रचंड आवड. आता जरा चांगलाच स्थिरावलो होतो. गप्प बसायचंच नाही. म्हणून शालेय व्यवस्थापन आणि  व्होकेशनल गायडन्स अशा दोन्ही पदविका पूर्ण केल्या. वीस वर्षांपूर्वी जिथे मन सारखे रुंजी घालत होते ते पत्रकारितेच वेड काही सुटता सुटलेले नव्हते.
                     यापूर्वी सतत येताना जाताना खुणावणारी पत्रकार संघाची वास्तू मी अनेकदा चाळून गेलो होतो. शेवटी २०१७ मध्ये  , बरोबर वीस वर्षांनी ते शक्य झाले. वेब पत्रकारितेला प्रवेश घेतला . वृत्तपत्रे. पत्रकार , लेखक, यांचा नेहमीच आदर वाटायचा. त्यांच्या कामाचे , लिखाणाच्या कासबींचे, धाटणीचे, धाडसाचे, आणि उभ्या आयुष्याचे कधीही न संपणारे माझे कुतूहल,मनस्वी आदर आणि उर्मीची  आज परिपूर्ती होताना हात आकाशाला टेकल्या सारखे वाटतात. सचिनने शतकांची सेन्चुरी मारल्यानंतर त्याच्या निरोपाच्या मनोगतात म्हटलेले एक विधान खुप सार्थ वाटते.'' स्वप्न नक्की पूर्ण होतात, ती पहायची आणि जगायचीही असतात .'' शिक्षकीपेशाच्या  मध्यावर तसेच काहीसे अनुभवताना आणि या पत्रकार संघाचा विद्यार्थी होताना आज तोच सचिन आठवतोय. या ज्ञानमंदिराच्या शिदोरीवर किमान माझ्या क्षेत्रातले असंख्य शिक्षक, विद्यार्थी पालक, व्यवस्थापन यांचे धगधगते प्रश्न कोणत्याना कोणत्या मार्गाने जनता जनार्दनाच्या गाभाऱ्यात मांडता आले कि मला कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभेल हीच एक अपेक्षा.
                                                                                                                                                                                                                                                    मुंबई मराठी पत्रकार संघ ---->

  


<<<<<---  चिंतामण रामचंद्र शिवेकर 




                 निवृत्ती चांगदेव सोनावणे 
                                         ------>>>













टिप्पण्या

  1. जयवंतराव तुमचा संघर्ष व धडपड इतरांना नेहमीच प्रेरणा देत राहील तुम्ही खूप यशस्वी व्हा याच आमच्या शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर !!
    मी हे वाचून खूप काही गोष्टी घेतल्यात., तुमच्या या लेखणीतून मला प्रेरणा मिळाली सर...

    उत्तर द्याहटवा
  3. मित्राला प्रगतीसाठी सहकार्य करणाऱ्या मित्राला सादर प्रणाम...
    कोणताही अभिनिवेश न बाळगता मित्रासाठी शक्य होतील ते सर्व प्रयत्न करणे म्हणजे मैत्री निभावणे...

    उत्तर द्याहटवा
  4. फार छान आणि मोजक्या शब्दात तुमचा जीवनसंघर्ष मांडला आहे सर, असेच लिहीत रहा. तुमच्या भावी पत्रकारितेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर लिखाण आणि प्रेरणादायी लेख आहे ..... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या

    उत्तर द्याहटवा
  6. कोणताही विषय घेऊन त्या वर लिखाण करण्या पेक्षा स्वता अनुभवलेल्या गोष्टी वर लिहिणे हे खुपच मजेशीर असते , तुमचा हा ब्लॉग वाचताना मी पत्रकार संघात कशी पोहचले या सर्व आठवणी ताज्या झाल्या , धन्यवाद . आणि शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  7. गांधी बाल मंदिर या शाळेत तुम्ही आम्हाला वर्गप्रमुख म्हणून लाभले हे आमचे खरेच सदभाग्य आहे...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तिन्ही सांजेला कविता

गुरुजनहो गतिमान होऊया !