गुरुजनहो गतिमान होऊया !
गुरुजन हो गतिमान होऊ या !
( बदलत्या काळातील शिक्षकांची
भूमिका )
सर्व साधारणपणे
१५ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले की दोन ते तीन आठवडयात शाळा शाळांमधून मोठ्या
उत्साहात 'गुरु पौर्णिमा ' आणि त्यानंतर ५ सप्टेंबर
अर्थात ' शिक्षक दिनाची ' धूम पहावयास मिळते. छोट्या छोट्या पानांमध्ये
लपेटलेली लालबुंद गुलाबाची एक दोन फुलं आपले वर्ग शिक्षक किंवा आवडत्या शिक्षकांना
देऊन त्यांच्या पायावर डोकं टेकवून नतमस्तक होण्यासाठी पहिली ते पाचवी-सहावीच्या मुलांची
झुंबड कोणत्याही सहृदय शिक्षकाच्या अंगावर मनभर मांस चढवून जाते. तुलनेने वरच्या वर्गातील
हा सोहळा संपूर्ण वर्गाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात होताना दिसतो. कॉलेजची पायरी
चढलेली तरुण मंडळी व्हाटसअप , फेसबूक, इंस्टाग्राम किवा ब्लॉगवर कृतज्ञतादर्शक पिक्स
आणि पोस्ट्स टाकून माय स्कूल .. मिस यू.. वगैरे वगैरे हेडर टाकून साजरा
करताना आढळतात. तीन भिन्न पातळयांवरील आदर व्यक्त करण्याची पद्धत आणि माध्यमांमधील
हा बदल अगंतुक म्हणावा का ? कि यात काही सूचक इशारा दडलेला आहे असे समजावे.
क्षणभर हल्लीच्या विद्यार्थ्यांची ती कालसुसंगत भूमिका मानूया. हाच बदल स्वीकारणे आता
शिक्षकांना क्रमप्राप्त होणार आहे. कोणत्याही व्यवसायातील हे भूमिका संक्रमण
होणे ही प्रत्येक काळाची गरजच असते. आजच्या पिढीचे तंत्रज्ञान अवगत करूनच हा जनरेशन
गॅप सांधला जाऊ शकतो.
गुरुर्ब्र्हम्हा गुरुर्विष्णू
पासून सुरु झालेला अनादी कालापासूनचा हा एक प्रदीर्घ प्रवास आज एकविसाव्या शतकाच्या
तोंडावर गुरुजी, बाई, सर, मॅडम, टीचर, मँम, मिस पर्यंत आपसूक येऊन पोहचला. तोही आता टयुटर, कोच, इनस्त्क्टर, ट्रेनर, गाईड या वळण
वाटा घेत पुढे किमान शंभरएक वर्षात आयझॅक ऑसिमोव्हच्या ‘’मॅकॅनिकल टीचर‘’ म्हणजेच रोबोटिक
टीचर पर्यंत पोहचायला फार काळ लागणार नाही. ‘’कालाय तस्मै नमः ‘’ या उक्तीप्रमाणे शिक्षक
या एका व्रतस्थ भूमिकेचा प्रवास कालसुसंगतपणे गेल्या
दशकापर्यंत होत आला असे म्हणायला हरकत नाही. प्रश्न उभा राहतो तो येऊ घातलेल्या काळाचा.
चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतानुसार –“ सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट “ हे तत्त्व आज
तागायत मानव उत्क्रांतीप्रमाणेच सामान्य जनजीवनापासून राजकारण, समाजकारण, अर्थकारण,
औद्योगीकीकरण, व्यावसायिकीकरण अशा सर्वच बाबींना स्पर्श करते. शिक्षणक्षेत्रही त्यास
अपवाद होऊ शकत नाही. शिक्षणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांपासून शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम,
शाळा, पाठ्य पुस्तके, अध्ययन अध्यापन प्रकिया आणि या साखळीतील मानवी घटक अर्थात विद्यार्थी
शिक्षक पालक आणि समाज या सर्व परिघावरील प्रत्येक बिंदूंची ज्याठिकाणी सांधेजोडणी होते
असा केंद्र बिंदू म्हणजे शिक्षकाची भूमिका होय. हे संपूर्ण चक्र गतिमान होण्यासाठी
शिक्षकांची कालसुसंगत गतिमान भूमिका असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता पारंपारिक
भूमिकेतून बाहेर पडणे म्हणजेच आपले अस्तित्व टिकविणे होय. असे न झाल्यास देशाच्या सर्वांगीण
प्रगतीचा पोकळ आभासच शिल्लक राहिल.
एक नजर ‘ असर ’ वर : - ASER - ( ANNUAL STATUS OF EDUCATION REPORT )
देशातील शिक्षणाकडे समग्र दृष्टीने पाहताना सक्षम अशी प्रशासकीय
मूल्यमापन यंत्रणा अस्तित्वात नसणे आणि उपलब्ध व्यवस्थेमध्येच अनेक दोष असणे ही अतिशय
खेदाची बाब आहे. वर्षोनुवर्षे शाळा, शिक्षक, अध्ययन अध्यापन आणि शिक्षणाचे वास्तववादी
मूल्यमापनच होत नाही. गेल्या काही वर्षात ‘
असर ‘ या अशासकीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेने हेच शिक्षणाचे चित्र मांडण्याचे काम
केले आहे. सन २०१६ मध्येही देशातील ५८९ जिल्यातील
१७४७३ ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या सर्वच विषयातील विद्यार्थ्याचे
आकलन किती आहे याची बृहद पाहणी केली. यात सुमारे ५ लाख ६२ हजार ३०५ विद्यार्थाचे सर्वेक्षण
करण्यात आले. सुमारे ४९९ संस्थामधील २५००० प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी हे सर्वेक्षण
करून खालील मुद्दे अहवालाट नमूद केले. ज्यामधून आज सधी शिक्षकांनी आपले अध्यापन सुधारण्याची
प्रचंड गरज व्यक्त होते. अहवालातील सगळी आकडेवारी धक्कादायक असून ती वेबसाईटवरही उपलब्ध आहे. अहवालातील मुद्दे शिक्षकांच्या आजच्या
भूमिकेविषयी भाष्य करतात.
AFTER THE SURVEY WAS CONDUCTED, THERE ARE A FEW IMPORTANT FACTORS THAT
ASER WANTS THE EDUCATIONAL BODIES ACROSS THE COUNTRY TO TAKE SERIOSLY-
1] Students
can not be taught only
English, skills beyond that
are also needed to be introduced and inculcated, promoted.
2] Syllabus needs to go through a revision
as age old
benefits have undergone tremendous change but
the
text books maintain the same
tradition. Change is constant
thing for flexibility and adaptability.
3] Barriers in terms
of digital education should not
be encouraged.
The world has gone digital,
why not our
country ?
आजच्या शिक्षकांपुढील आव्हाने
व अपेक्षित भूमिका :-
अ) शासकीय धोरणे :- माध्यमिक शाळा संहिता आणि सद्यस्थितीत २००९ सालापासून “शिक्षण हक्क कायदा,“
क्षमताधिष्ठित शिक्षण, आनंददायी शिक्षण, इयत्ता आठवी पर्यंत ना नापास धोरण, नववी /
दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा, जवळजवळ सर्वच कामे ऑनलाइन /
डिजिटल पद्धतीने करणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, जलद गतीने शिक्षण, अध्ययन अध्यापन
प्रकियेत ज्ञानरचना वाद यासारखे शिक्षणातील गुणवत्तावर्धिष्णू धोरणे लागू करण्यात आली
आहेत. त्याच बरोबर सुधारित संच मान्यतेचे निकष, या क्षेत्रात येण्यासाठी प्रवेश परीक्षा,
सातत्याने बदलणारी मूल्यमापन पद्धती, अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांबद्दलची समायोजन विषयक
धोरणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षेबाबत धोरणे, दैनंदिन कामकाजाची कार्य पद्धती आणि अशैक्षणिक
कामे यासारख्या अनपेक्षित बाबींना सर्वतोपरी
मानसिक संतुलन ढळू न देता सामोरे जाणे, सकारात्मक विचार बाळगणे हेच हितावह ठरते. सर्व
प्रशासकीय चौकटींतून शिक्षकांची अभिप्रेत भूमिका वेळोवेळी गतिमान आणि आव्हानात्मक बनत
आहे.
वरील काही बाबी वैयक्तिक तत्व व भूमिकेच्या विरुद्ध असू शकतात तथापि त्या सर्वांचे
अंतिम लक्ष हे विद्यार्थी हीतास पोषक असल्याचे मानून त्याकडे आपण आपल्या कर्तव्य भावनेची
जोड देणे, संगणकाशी मैत्री करणे, उपलब्ध वेळेचे दर्जात्मक नियोजन करणे इष्ट ठरते.
ब) विद्यार्थी विषयक भूमिका
:-
आपल्या वर्गातील अध्ययन अक्षमता (एल. डी.), अतिचंचलता ( ए डी एच डी), व्यसनाधीनता
( अॅडिक्शन), कंपूशाही (पीअर प्रेशर), कौमार्यावस्था ( टीन एज इफेक्ट्स), अपंगत्व(
हॅन्डीकॅप) वैयक्तिक / कौटुंबिक ताणतणाव ( स्ट्रेस), बालमजुरी आणि गुन्हेगारी, अशा
अनेक व्यक्ती तितक्या प्रकृतीच्या विद्यार्थ्यांशी आपला रोजचा संबंध असतो. दुसरीकडे
प्रतिभासंपन्न, कुशाग्र बुद्धिमत्तेची, प्रगल्भ ( चाइल्ड प्रोडेजी )गुणवान कौशल्य संपन्न
आणि कलाकार असेही विद्यार्थी वर्गात असतात. अशा प्रत्येकाची जबाबदारी आपण निभावतो.
समस्याग्रस्त असो व सामान्य विद्यार्थी ते माझ मुल आहे या नात्याचा मनस्वी स्वीकार
त्यांच्याशी निगडीत कोणत्याही कामात गुणवत्ता निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांशी निगडीत
खालील प्रकारची भूमिका ही आपली नैतिक गरज आहे.
·
अभ्यासोनी प्रकटावे : - विद्यार्थी मनावरील आपली आदरयुक्त छाप आपल्या विषयातील सखोल ज्ञान, कोणत्याही मुलाची
हवी ती शंका निरसन करण्याची शिक्षकाची क्षमता आणि मैत्रीपूर्ण अध्यापन शैलीने नक्की
पडते. गंभीर विषय शिकविताना देखील संपूर्ण वर्ग एका तासिकेत खळखळून हसायलाच पाहिजे.
तशी विनोदबुद्धीची जोड देऊन आपल्या विषयाची भीती न वाटता गोडी कशी लागेल यावर सतत चिंतन
हवे, दैनंदिन जीवनातील माझ्या विषयाचा कधी कुठे कसा उपयोग होतो याची जबरदस्त सांगड
घातल्यास इंग्रजी,गणित, विज्ञान हे विषय सुद्धा आवडू लागतात. शिक्षकाचे असे समरसून
शिकवणे सुरु झाले कि त्या शिक्षकाचा प्रत्येक शब्द मुले ‘’ सर ऑखोपर ‘’ मानतात. यासाठी
थोडी तयारी, समरसून शिकविण्याचे कौशल्य आणि मुलांना शिकविण्याचा लळा या भूमिकेचा अंगीकार
हवा आहे.
·
तंत्रज्ञान कुशलतेची सर्वाधिक
आवश्यकता : - आदिवासी, दुर्गम,ग्रामीण भागातील शाळादेखील झपाटयाने डिजिटल होत आहेत. प्रत्येक विद्यार्थी आता स्मार्ट
फोन, टॅब, फोर जी, इत्यादी साधने लीलया हाताळताना दिसतात. शाळेतील हजेरी पासून पायाभूत
परीक्षांचे गुण ऑनलाइन पाठविणे, ई बँकिंग पासून व्हर्च्युअल क्लासरूम या बाबींनी या
आधीच भक्कम पाय रोवले आहेत. सातवी, नववीच्या पाठ्यपुस्तकांत क्यू आर कोडच्या मदतीने
अभ्यासक्रम अतिशय रंजक लाईव्ह पद्धतीने शिकविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या विषयात
रसनिर्मिती करण्यासाठी ही नामी संधी आहे. या तांत्रिक बाबींना आपत्ती न मानता ईस्टापत्ती
मानावे. हे सर्व बदल समर्थपणे पेलण्यासाठी आपल्यातील तंत्रस्नेही शिक्षक जागृत होणे
ही भविष्याची सर्वात मोठी गरज आहे.
·
बुध्यांक, भावनांक, समाजिक
भान [ आय.क्यू / ई.क्यू / एस्.क्यू ]:- शब्द कोढी, अंताक्षरी, कब्बड्डी, खो खो, लंगडी, बुद्धिबळ असे खेळ जाऊन मुलांच्या
हाती नेट आणि मोबईल आले. मोबाईलने सबवे सर्फ, ट्राफिक रायडर, टेम्पल रन, कॅन्डीक्रश
सागा, बबल शुटर, असे अनेक खेळ देऊन मुलांना चाळवून आजच्या पिढीला ब्लू व्हेलने जीवघेणा
विळख्यात अडकविले. विभक्त कुटुंब, पालक पाल्य हरवलेला संवाद, बदललेली मैत्रीची व्याख्या,
शिकून काय करायचं तसच जगून तरी काय करू असे प्रश्न टीन एजर्सना भेडसावू लागले आहेत.
आजूबाजूला घडणाऱ्या सैराट घटना चुकून आपल्याच
घरात, वर्गात घडल्यातर ? कल्पनाही करवत नाही. नेमक कोणी, कधी, कुठे, कसे, आणि काय करायला
हवे याची सुसूत्र चर्चा घडवून आपली बुद्धी भावना आणि सामाजिक भान कसे राखावे हे दैनंदिन
अध्यापनातून शिक्षकांनी गळी उतरविण्याची, सतत सजग राहण्याची भूमिका घ्यावी.
बौद्धिक, भावनिक, सामाजिक भान उंचावणाऱ्या
आणि विकासाला पूरक प्रश्न आणि उदाहरणाची वर्गाध्यापनात योजना करणे, व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने
विद्यार्थ्याच्या व्यक्तीभिन्नतेचा सकारात्मक स्वीकार करणे, त्यांच्या उणीवा आणि बलस्थानांचा
अभ्यास करून क्षमता व कौशल्याना पूर्ण संधी व प्रोत्साहन देणे, निकोप शारीरिक भावनिक वाढीसाठी
अभ्यासाइतकेच कला क्रीडा उपक्रमातून जीवनविषयक रसिकता, आशावादी दृष्टीकोन हार-जीत,
ताणताणावाला सामोरे जाणे ही कौशल्ये रुजविणे. ही या भूमिकेची दिशा असावी.
·
स्वयं-शिस्तीचे तत्व
:- छम छम छडीचा जमाना फार पूर्वीच गेला. हसा, खेळा पण
शिस्त पाळा ही उक्ती काहीशी तडजोड म्हणून ठीक होती. मात्र याही पुढे जावून विद्यार्थ्याला
कोणत्याही प्रकारची शिक्षा करणे आता कायद्याने गुन्हा ठरणे हे अलीकडच्या काळातील शासनाचे
धोरण शिक्षकांनी केलेल्या शिक्षेनंतरच्या परिणामांचा विचार करायला भाग पडणारे आहे.
घरचा अभ्यास न करण्यापासून छेडछाड करणे, वारंवार उर्मटपणे वागणे, अपेक्षित गणवेष नसणे,
दांड्या मारणे, खोटेपणा करणे, स्टाईल मारणे, मारामाऱ्या, व्यसनं, तोडफोड करणे असे अनेक
प्रकार शाळेत घडतात तेव्हा हाती उरते ती कायदेशीर हतबलता. अशावेळी आपलाही तोल न ढळू
देता स्वयं शिस्तीचे तत्त्व पाळणे, पालक, वरिष्ठ सहकारी, मुख्याध्यापक, समुपदेशक,संस्था
चालक यांच्याशी सल्लामसलत करून समस्या सोडविणे आवश्यक ठरते.
·
समुपदेशकांचे सहकार्य :- समस्याग्रस्त, तणावग्रस्त, विषम समायोजित, विशेष गरजा असलेल्या, मतिमंदत्व, गतिमंदत्व, अविकसित क्षमता, अभ्यासात
नेहमी मागे राहणारे अशा मुलांसाठी समुपदेशकांची निश्चित मदत घेता येते. विद्यार्थ्यांच्या
मानसशास्त्रीय चाचणीद्वारे गरजेनुसार पालकांचेही समुपदेशन उपलब्ध करून घ्यावे. समुदेशनातून
अनेक समस्यांची सोडवणूक करून घेता येते.
·
शिक्षण हक्काचे सर्वतोपरी
रक्षण / पालन :- शिक्षण हक्क कायद्याने प्रत्येक
विद्यार्थ्यास बहाल केलेल्या सर्व हक्कांबाबत कृतियुक्त आदर बाळगून शिक्षक म्हणून आवश्यक
त्या सर्व कर्तव्याप्रति कटिबध्द राहण्याची भूमिका आज बदलत्या काळातील शिक्षकांनी अंगीकारणे
हेच सर्वार्थाने संयुक्तिक ठरते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्र अस्तित्वाचा,
त्याचे विचार, भावना, गरजा, शैक्षणिक, भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीसह त्याचा
स्वीकार आणि आदर करणे आवश्यक आहे. कोणत्याही बाबतीत भेदभाव न बाळगता ‘ समान संधी, समान
दर्जा ‘ या भूमिकेतून वर्गावर्गातील दैनंदिन व्यवहार घडावेत.
क ) पालकविषयक भूमिका : - पालक आपल्या पाल्याबाबत अतिशय संवेदनशील असतात. ते
स्वाभाविकही आहे. आपलं मुल वर्षातील सुमारे
२६० दिवस शाळा व शिक्षकांच्या हवाली मोठया विश्वासाने सुपूर्त करतात. या अर्थाने शाळा
आणि शिक्षकांची भूमिका अतिशय जबाबदारीची ठरते. ते मुलही घर सोडल्यानंतर सामाजिकीकरणाची
पहिली पायरी म्हणून शाळेतच पहिले पाऊल टाकते. छोटा शिशुपासून सुरु होतो तो एक प्रवास,
विश्वासाचा, सर्वांगीण विकासाचा. किमान शालान्त परीक्षेपर्यंतचा. शाळा, शिक्षक, पालक
आणि विद्यार्थी यातून त्याच्या आयुष्याचे सुंदर शिल्प ज्या विश्वासाच्या पायावर साकारते
त्या विश्वासाच्या तडा न जाऊ देणे अशी एक व्रतस्थ भूमिका या ठिकाणी अभिप्रेत असते.
त्यात सुसंवादाचे पूल टिकविण्याची जबाबदार भूमिका महत्त्वाची ठरते.
ड ) शाळा, संस्था, सहकारी आणि
कामकाज विषयक भूमिका : - आपली कर्मभूमी या नात्याने आपल्या शिक्षक म्हणून कारकीर्तीचे खरे साक्षीदार
शाळा, संस्था, व सहकारी हेच असतात. आपली सुख दुख्खे, अडीआडचणी, असंख्य चूका इथेच समजून
घेतल्या जातात. आपले सहकारी कधी मित्र, टीकाकार, हितचिंतक तरी कधी संकटकाळी रक्ताच्या
नात्यापेक्षा आगोदर धावून येतात. काहीच्या बाबतीत ही बाब म्हणजे प्रचंड संघर्षाची रणभूमी
ठरते. ते अतिशय दुर्दैवी आहे. या ठिकाणी भावनिक, कायदेशीर, कार्यालयीन संघर्ष टाळण्यासाठी
खालील पथ्य पाळणे कधीही हितावह ठरते.
१ ) संस्था व तिची उद्दिष्टे,
संस्था चालक, वरिष्ठ / कनिष्ठ सहकारी यांच्याविषयी मनापासून आदर भाव, प्रामाणिक सहकार्य,
संघ भावना आणि कष्टाची तयारी ठेवणे. नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करणे.
२) संस्थेच्या गरजा ओळखून व्यक्तिगत
फायद्याचा विचार बाजूला ठेवून संस्थेसाठी कार्यरत राहणे. अध्यापन, विद्यार्थी, सहकारी,
आणि पालक हे सर्व एक कुटुंब भावनेने दर्जेदार काम करणे. त्यांची प्रतिष्टा, नावलौकिकात
भर घालणे. त्यास बाधा येईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची खबरदारी
बाळगणे.
3) शाळेची वास्तू, भौतिक सुविधा,
मनुष्यबळ, यशस्वीता, गुणात्मक वाढ, विविध योजना, संकल्प, उपक्रम, यांची दाखल घेणे,
वेळोवेळी जबाबदारी उचलणे. संस्था, सहकारी विद्यार्थी यांचे यश हीच आपली खरी मिळकत मानून
त्यांचा आपल्या वरील विश्वासास पात्र राहणे.
४) संस्था, सहकारी, विद्यार्थी,
पालक यांच्या कोणत्याही प्रकारच्या संघर्षाच्या काळात एकनिष्ठपणे खंबीरपणे पाठीशी उभे
राहून एकजूट टिकविणे.
५ ) आपल्या अनुभवाचा कला गुणांचा
संस्था, सहकारी, इत्यादींना वेळोवेळी लाभ करून
देणे. यांचे हित हेच माझे हित ही भूमिका स्वीकारणे.
इ ) वैयक्तिक भूमिका : - शिक्षणाकडून राष्ट्राची अपेक्षा वर्णन करताना नेहमीच
‘’ सुजाण, सुबुध्द, सुसंस्कृत, सुशील, जबाबदार आणि उद्यमशील नागरिक घडविणारे शिक्षण
हवे “ या अर्थाची शब्दरत्नावली मांडली जाते. ती योग्यही आहेच. मात्र खरी गरज आहे
ती या शब्दरत्नावलीतील धागा असणाऱ्या शिक्षकाच्या वैयक्तिक भूमिकेचाही विचार करण्याची.
शिक्षकाने व्यक्तिशः खालील भूमिकेचे अनुसरण करावे.
१)
स्वतःच्या अध्यापनाचे सातत्याने
स्वयं मूल्यमापन आणि आत्मपरीक्षण करीत राहणे.
२)
प्रतिवर्षी स्वतःची शैक्षणिक
आणि व्यवसायिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढील शिक्षण घेत रहावे.
३)
नवनवीन शैक्षणिक प्रयोग, शैक्षणिक
साहित्य, सृजनशील प्रतिकृती इत्यादींची निर्मिती करावी.
४)
आपल्या क्षेत्रातील नवीन संशोधन,
विचार प्रवाह, पुस्तके, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, शासनाची धोरणे, तंत्रज्ञान,
प्रशिक्षणे याबाबत जागरूक राहून ती आत्मसात करणे.
५)
आपल्या विषयातील विविध कौशल्ये
कोणती, ती मुलांमध्ये कशी रुजवायची, विषयाचे व्यवहारी जीवनात कसे उपयोजन होते, पुढे यातून कोणत्या शैक्षणिक आणि व्यवसायिक करिअरच्या
संधी उपलब्ध होतात, त्यातून कोणते व्यवसायिक समाधान मिळू शकते इत्यादीची सखोल माहिती
वारंवार मुलांना दयावी. त्यांनी ते क्षत्र निवडल्यास पुढील मार्गदर्शन करावे.
६)
आपला व्यवसाय सांभाळून एक शिक्षक
म्हणून घर, स्वतःचा परिवार, आजूबाजूचा समाज, सामाजिक संस्था व समाजोपयोगी कार्यात सहभाग
घ्यावा, स्वतःचे आरोग्य आणि निकोप वर्तन शैली आत्मसात करावी.
थोर तत्वज्ञ बट्रान्द रस्सेल त्यांच्या ( Impact of science on society ) या ग्रंथात म्हणतात - ‘’ We are
in the middle
of a race
between skill as to means and human
folly as ends .‘’ अर्थात मानवी कौशल्यातून उत्कार्ष्याची साधने निर्माण होतात
आणि मानवी मुर्खपणा मानवाला उद्दिष्ठांपासून दूर नेतो. नव्या जुन्याची एकजीव जोडणी
करण्याची आजपूर्वी कधी नव्हती एवढी तीव्र गरज भासते आहे. आपल्याला या शर्यतीत राहायचे
तर आहेच, परंतु आपल्या गतीचे नियमनही करायचे आहे. अंतिम निकालाचा अट्टहास न बाळगता.
या शर्यतीमधून आनंद, उत्साह सुद्धा निर्माण करायचा आहे. रस्सेल यांचे हे विधान बदलत्या
काळातील शिक्षकांच्या भूमिकेबाबत सूचक इशारा करते,
जयवंत
कुलकर्णी,
करिअर समुपदेशक
उत्तर द्याहटवासुंदर व वाचनिय ब्लॉग
छान .
उत्तर द्याहटवाब्लाग छान व मार्मिक आहे
उत्तर द्याहटवा