करीयरची सप्तपदी

                                                              करिअरची सप्तपदी

              ' सप्तपदी ' या शब्दालाच एक सोहळ्याच आणि बांधिलकीचे वलय प्राप्त झालं आहे. यातील सप्त म्हणजे सात आणि पदी म्हणजे पाऊले.  मे महिन्यात तस म्हटलं तर लग्न सराई असते. जिकडे धुमधडाक्यात लग्नाचे बार  उडवून दिले जातात. बोहल्यावर चढलेले नवरा नवरी आपल्या सुखी आणि समृध्द जीवनाची सुरुवात करताना  इष्ट मित्रांच्या साक्षीने एकमेकांचा स्वीकार करताना आणा भाका घेतात. अग्निहोत्राच्या भोवती पुढे नवरा मागे नवरी सात फेरे पूर्ण करतात. त्या पाठोपाठ पाटावरच्या सुपारीला नववधू अंगठ्याने बाजूला सरकवत सात वचने देते. तेही सात जन्माच्या अखंड साथ निभावण्याचे. हा विधी सगळ्यांनीच अगदी लहानपणापासून पाहिलेला आहे. याच सप्तपदीने आपल्या आयुष्यातील एक मोठे स्थित्यंतर होणे अपेक्षित असते कारण आपल्या तरुणाईच्या भाषेत ती एक कमिटमेंट असते, आपल्या जोडीदारासोबत केलेली.
               मित्रानो, बहुदा अशीच एक  कमिटमेंट आपण करायची असते तीही आपल्या करियर सोबत. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद नेहमी म्हणायचे '' हॉकीही मेरी जीवन संगिनी है !" हल्लीच्या काळात आधी लग्न करीयरसोबत मगच साथीदारासोबत असा एक भक्कम रुजलेला संकेतच आहे. जे करियर आपल्या संपूर्ण आयुष्याचाच अविभाज्य भाग बनते, त्याच्यातही कमिटमेंट करूनच पदार्पण करणे खूप आवश्यक आहे. करीयर निवडीपूर्वीच्या अशा सात गोष्टी या करीयरची सप्तपदीच ठरतात. आवड, अभियोग्यता, बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता, व्यक्तिमत्व, शैक्षणिक संपादणूक आणि परिस्थिती या प्रत्येक  पावलाच विचार करूनच क्षेत्र  ठरविणे ही  सुखी आणि समाधानी करीयरची  गुरुकिल्ली आहे.
         १)   आवड -
               
                करीयर करावं ते आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी विचारात घेऊनच.पण ती आवड ओळखायची कशी ? तर ते सहज सोप्प आहे. यात आपण जोपासलेले छंद, असे काम जे कधीही कितीही वेळा करायला सांगा तोच उत्साह, तेही हसतमुखाने तडीस नेणे,  स्वयं प्रेरणेने  केलेले प्रत्येक काम, अभ्यासलेले विषय, शारीरिक, मानसिक, आर्थिक  ओढाताण झाली तरी राजीखुशीने स्वीकारण्याची सततची तयारी आणि मुख्य म्हणजे विषय वा कामात झोकून देण्याची मनस्वी तयारी म्हणजे आवड. आवडीतून मिळते ती सवड म्हणजे त्या गोष्टीसाठी हवा तेवढा वेळ देण्याची तयारी. आवडीतूनच उत्पन्न होतो तो म्हणजे व्यासंग. व्यासंग जडला कि त्या क्षेत्रात प्राप्त होते ते सखोल ज्ञान. ज्ञानाला   प्रत्यक्ष कृतीची जोड दिली कि येते नैपुण्य. जिथे नैपुण्य आढळते, ती व्यक्ती, ते क्षेत्र  आणि राष्ट्र मोठे होण्यास मोठा हातभार लागतो.
         २)  अभियोग्यता - 
               अभियोग्यता म्हणजे स्वताची कुवत. ती शारीरिक, बौद्धिक, अथवा मनोकायिक असू शकते. अभियोग्यता ही तो विषय किवा काम प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता आहे. एखादी गोष्ट समजून घेऊन ती सिद्ध करता आली म्हणजे त्या व्यक्तीत ती अभियोग्यता आहे असे आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ ,ठराविक वेळेत विशिष्ट अंतर धावणे, अवघड आकडेमोड करणे, विशिष्ट घटनाक्रमानुसार तर्क / भाकीत करणे किंवा अंदाज बांधणे, साम्यभेद पटकन ओळखता येणे, चिन्हाचा अर्थ लावणे, मर्यादित वेळेत एखादे काम अचूकपणे पूर्ण करणे इत्यादी. अभियोग्यतेत प्रयत्नपूर्वक प्रशिक्षणाने काही प्रमाणात वाढ करता येते. बहुतांश व्यावसायिक यशापयश माणसाच्या अंगी असलेल्या अभियोग्यतेवर अवलंबून असते. जे जे उत्तम जमते तेच करावे असा साधा सरळ अर्थ अभियोग्यतेचा आहे. 
         ३) बुद्धिमत्ता-
             बुद्धिमत्तेचा सरळ सरळ संबंध मेंदूशी जोडला जातो. बव्हंशी ते खरेही आहे. पाश्चात्य मनोविश्लेषक गार्डनर यांनी बहुविध अशी आठ प्रकारच्या  बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला आहे.  काही कामे, अभ्यासक्रम पूर्ण कण्यासाठी विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असावीच लागते. आपली बुद्धीमत्ता कोणत्या प्रकारची आहे हे निरीक्षण, अनुभव तसेच काही मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे शोध घेता येणे शक्य आहे. ज्ञानार्जन, समस्येचे आकलन, तिची योग्य उकल करणे, अचूक विचार करणे, अनुमान, विश्लेषण, कल्पकता, बहुमितीय विचार करण्याची क्षमता यांचा अनेक अभ्यासशाखा आणि व्यवसाय यांच्याशी जवळून संबंध येतो. विद्वान सर्वत्र पूज्यते असे म्हणतात ते याच कारणाने. आपल्या बुद्धीमत्तेनुसार अभ्यासक्रमाची निवड केल्यास ताणतणाव येत नाही. शिवाय मानवी संसाधनाच्या बुद्धिमत्तेचे उत्तम व्यवस्थापन करता येते. व्यक्ती आणि समाजातील नैराश्य कमी करता येते.
    ४ ) शैक्षणिक संपादणूक / प्रगती -
         आपल्या शालेय  आणि महाविद्यालयीन कारकिर्दीतील विविध परीक्षा, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांमध्ये   मिळणाऱ्या गुण आणि टक्केवारीनुसार आपल्याला विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. मार्कांना महत्व नाही असे म्हणतानासुद्धा प्रवर्गनिहाय आणि उपलब्द जागांचा विचार करताना गुणांना महत्व प्राप्त होतेच. शालेय जीवनातच त्याचा पाया भक्कम असणे महत्वाचे ठरते. गुणांपेक्षा त्याहून अधिक महत्वाची आहेच. तरी देखील उत्तम शैक्षणिक गुण आणि गुणवत्तेचा चढता आलेख व्यक्तीला पुढील वाटचालीस प्रेरक आणि पोषक ठरतो.
     ५)शारीरिक क्षमता -
            साऱ्या क्षमता, अभियोग्यता, कौशल्यांचे माहेरघर म्हणजे आपले शरीर, यावर तर सगळीच धुरा अवलंबून आहे. करियर आणि शरीर तशा परस्परावलंबी गोष्टी आहेत. चेहरा, अंगकाठी, बांधेसूद पणा, चपळता, अंगातील ताकद, सर्वांगातील  विविध कौशल्ये, वर्ण, आवाज,उंची, वजन  अशा कित्येक बाबींचा संबंध येतो ती म्हणजे अभिनय किंवा मनोरंजन, संरक्षण, क्रीडा, कृषी आणि सगळ्याच क्षेत्रात आवश्यक असलेली हस्तकौशल्य, आरोग्य विषयक क्षमतांचा करियरवर चांगला वाईट परिणाम होतो. आपल्यातील शारीरिक मर्यादांचा, सम्पन्नता, आजार, विकार, व्यंग, उणीवांचा आणि कमी अधिक असण्याचा विचार सुद्धा करियर निवडीपूर्वी करायलाच हवा. अर्थात क्षेत्र कोणतेही असो, सुदृढ शरीराशिवाय त्यातील आनंद , समाधान मिळणे केवळ अशक्यच आहे.
     ६ ) व्यक्तिमत्व -
           व्यक्तिमत्व हि सर्वसमावेशक संकल्पना आहे. आपले दिसणे आणि असण्याची समोरच्यावर पडणारी छाप म्हणजे व्यक्तिमत्व असून ती एक गतिमान संकल्पना आहे. आपला स्वभाव, देहयष्टी, संभाषण / भाषा, सद्गुण दुर्गुण, चांगल्या वाईट सवयी, त्यात बदल करता येण्याची शक्यता आणि पातळी, सर्वात मात्वाचे म्हणजे आपल्या ठायी असलेला मूल्यसंचय जसे कि नितीमत्ता, प्रामाणिकपणा, बांधिलकी, जिद्द, चिकाटी, चातुर्य, माणसांशी संबंध प्रस्थापित करता येण्याचे कसब, गुणग्राहकता यावर व्यवसायिक प्रवेशानंतरचे अनेक पल्ले गाठणे अवलंबून असते. आपला स्वभाव बहिर्मुख कि अंतर्मुख, बोलका कि अबोल, मनमिळावू कि माणूसघाण्या, सोशल कि हेकट / तिरसट. आपले वागणे समजुतदारीचे  कि खुन्नशी / आढीबाज, कटकारस्थानी असे असंख्य पैलू करियर निवडीत लक्षात घ्यावेच लागतात.
      ७ ) परिस्थिती - 
           आपल्या करियरचा वेध घेताना आपल्या आजूबाजूच्या प्राप्त परिस्थितीचा अचूक बोध होणे हे या सप्तपदीतील शेवटचे महत्वाचे पाऊल ठरते.काळाच्या ओघात अनेक जुने उद्योग व्यवसाय एकतर नष्ट झाले, वा बदलले किंवा अत्याधुनिक अंगरख्यात नव्याने उदयास आले आहेत. कदाचित आज जे शिकू ते उद्या कालबाह्य झालेले असेल. किंबहुना प्रत्यक्ष व्यवसायात प्रवेश केल्यानंतरही बदलत्या काळानुसार स्वतःला बदलण्याची क्षमता बाळगू शकणारेच तग धरू शकतील, ही  जाणीव करीयरच्या प्रत्येक टप्प्यावर बाळगणे, नेहमीच नित्यनूतन राहणे, समाजाच्या त्यात्या काळातील गरजांचा मागोवा घेवून व्यवसायिक ज्ञान आणि कौशल्यात वाढ व विकास करत राहणे अतिशय महत्वाचे ठरते.
             
           मित्रानो, करीयरच्या या सप्तपदीच्या सतत जाणीवेतून कोणत्याही क्षेत्रात स्वतःला बिनधास्त झोकून द्या. तुमचा तर विकास कराच पण हे सर्व  '' इदं न मम ''  म्हणत '' राष्ट्राय प्रती गुह्यताम, समर्पयामि '' या न्यायाने  माझा देश, माझे राज्य, माझा समाज, माझे कुटुंब , माझे समाधान या प्राधान्य क्रमाने विचार करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या. इतकी उंच कि जिथे तुमच्या आकांक्षांपुढती गगनही ठेंगणे व्हावे. तुमच्या करियर सह्जीवनाला लाख लाख शुभेच्छा.     

               

टिप्पण्या

  1. अभ्यासपूर्ण लिहिताय, लगे रहो।

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार
    लेख फार उत्कृष्ट लिहीलाय. सप्तपदी सोबत व्यावसायिकतेची सद्य परिस्थिती किती महत्त्वाची आहे. ह्यांची सांगड फार योग्यरीत्या मांडलेय. एकदरीतच आजची स्त्री परिस्थितीच विश्लेषण चपखल.

    आज ही आपल्याकडे पालकच मुलं काय करतील ह्यांचा निर्णय घेतात.त्यामुळे मुलांना आपल्या आवडीच्या गोष्टी, छंद करता येत नाहीत. अशा मानसिक परिस्थितीत मुलं चुकीचे वाटेवर चालण्याची जास्त शक्यता असते.

    महाराष्ट्र राज्य वर्षभर एलफिस्टन विद्यालय, आझाद मैदान व मेट्रो सिनेमाच्या जंक्शन येथे हे आ‌हे. तेथे मुलांच्या आवडी, त्यांचा कुठल्या विषयावर कडे कल आहे. ह्यांचे योग्यते मार्गदर्शन करतात. ते जास्तीत जास्त वेळा मुलांना अनुकूल ठरतो. हा स्वअनुभव आहे.पालकांनी हरयाणा जरुर फायदा घ्यावा.

    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. खरंच, तुमचे लेख अतिशय अभ्यासपुर्ण असतात,सर. तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करणार यात शंकाच नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. जयवंत तुम्ही घातलेली सात फेऱ्यांची सांगड खूपच छान आहे तुमची अभ्यासू वृत्ती या ब्लॉगमधून दिसून येते ब्लॉग सुंदर व आकर्षक लिहिला आहे .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुजनहो गतिमान होऊया !

तिन्ही सांजेला कविता