श्रावण सरी

                                    श्रावण सरी 
                 
मित्रहो, आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. तो सुरू झाला की बालपण आठवू लागते. एकेकाळी गावाकडे श्रावणाच्या तयारीचा भाग म्हणून आधी  जिवतिच्या प्रतिमेचा घरभर शोध घेण्यासाठी बाया बापड्या कित्येक तास खटाटोप करायच्या. श्रावणातल्या कहाण्या, संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकातील ग्रीक मायथाॅलॉजीला पुरून उरेल अशी कथानके, पात्रे आणि घटनास्थळे यांच्या भावनिक संस्कारांचा फार झटकन प्रभाव पडायचा. आमच्या दोन काकू नदीतले चमकदार तुरटी सारखे दिसणारे शिरगोळे उगाळून घ्यायच्या. त्याच्या अजब गजब रंगांनी भिंतींवर वारली चित्रशैलीशी नाते जोडणारे नागकुळ काढायच्या. आख्खी भिंत हेच देवघर वाटू लागायची. ते शिरगोळे आज दिसेनासे झालेत बहुदा. गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी नदीतील चिखल आणून पाटावर गोकुळ बनविण्याचा प्रकार तर आजच्या केजी मध्ये  मातीकाम शकणार्‍या मुलांना दूरदूर पर्यन्त कोणी सांगेल का असा प्रश्न पडतो.  श्रावणाचा भागच असलेल्या  शुक्रवारच्या हळदी कुंकवाची लगबग, गूळ चणे फुटाणे यांचा प्रसाद,मंगळागौरीसाठी माहेरी हेलकावे खाणारे नव विवाहित लेकीचं मन, उंच लिंबाच्या फांद्यांना बांधलेले नागपंचमी झोके, त्यावरची गाणी आणि पाठोपाठ येणारा गौरी गणपतीचा सण हे सगळे आठवले की नकळत आजही मनाची भूतकालीन आंदोलने वाढवितो. रविवारी मुक्याचा वार म्हणजे अति बडबड्या बायकांची तारांबळ होती. सकाळी उठल्या नन्तर अंघोळ होई पर्यंत एकही शब्द न उच्चारन्याचे ते व्रत अंघोळी संपल्या रे संपल्या की कोणी कस बोलायला भाग पाडले हे किस्से ऐकविण्यात जी खसखस पिकायची ती खसखस आज कोणत्याही मॉल मध्ये मिळू शकणार नाही. अगदी सोमवार ते रविवार रोज उपवास, कहाण्या, त्यातील टिपिकल सुरवातीचे वाक्य म्हणजे '' आटपाट नगर होतं,. तिथं एक..... '' आणि मग जो काही भावनिक विलास चालायचा, तेव्हा ते भाबडे मन विना प्रश्न, विना अट सहज मान्य करायचा. असे का? अरे असे कसे शक्य आहे? असे किंतू परंतु कधीच मनात डोकावत नसत. श्रद्धेच्या म्हणा की अंधश्रध्दाच्या धरणेची एक वेगळीच पायाभरणी व्हायची. कथानक आणि पात्र वजा करून सारांश आने विचार करता त्यातील दया, परमेश्वरा प्रति कृतज्ञता, त्या मागील सामाजिक आध्यात्मिक विचार बालपण म्हणजे पेरणी योग्य जमिनीवर पडणारी पावसाळी श्रावण सर ठरायचे. अनेक असे घरगुती छोटेखानी समारंभ अगदी दिलखेच वाटायचे. गेली कित्येक दशके देवघराच्या कोनाड्यात आज ही प्रतिमा सौ. ने लावायला सांगितली आणि मनोमन खरच त्या ओळी आठवू लागल्या.... कोई लौटा दे मेरे बीते हूये दिन.....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुजनहो गतिमान होऊया !

तिन्ही सांजेला कविता