गोफ शैक्षणिक नात्यांचा
 ‘’ तुमची मुले ही तुमची नाहीतच, चिरंजीव होऊ इच्छिणाऱ्या जीवनाच्या उत्कट आकांक्षांची ती मुले           आहेत, तुमच्या देहाच्या वाटेने ती आलेली असली तरी तुम्ही केवळ निमित्त मात्र आहात. तुम्ही त्यांना आपलं प्रेम दया, पण आपले विचार मात्र देऊ नका. तुम्ही त्यांच्यासारखे खुशाल व्हा, होण्याचा प्रयत्न करा पण... त्यांना तुमच्यासारखे बनविण्याचा विचारही करू नका. लक्षात ठेवा, जीवन हे भूतकाळात रेंगाळत नसते, ते नेहमी पुढे जात असतं .’’ – खलिल जिब्रान
            पालकत्वावर चिंतनशील भाष्य करताना प्रसिद्ध लेबनॉन साहित्यिक खलिल जिब्रान ( १८८३ ते १९३१ ) यांचे एक अतिशय गाजलेलं अवतरण आजही समस्त पालक वर्गास चपखलपणे लागू पडते. भारतात २००९ साली लागू झालेला शिक्षण हक्क कायदा, आजच्या व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तसेच बालकाच्या  स्वतंत्र अस्तित्वाचा सर्वोत्तम पुरस्कार किमान शंभर वर्षांपूर्वीच खलिल जिब्रान यांच्या वरील रचनेत पहावयास मिळतो. चाकोरीबध्द रूढी परंपरातून लग्न संस्कार होतात, संसार सुरु होतो आणि निसर्ग नियमानुसार अनाहूतपणे पालकत्वाचं बिरूद आपल्या पदरी पडते. आपण आई बाबा होतो. सजगपणे पालकत्व स्वीकाण्याचे प्रमाण गेल्या दोन तीन दशकात, तेही शहरी भागात वाढताना दिसू लागले आहे. आज आधुनिकता, यांत्रिकीकरण, भौतिक सुखासीनता, टोकाच्या विभक्त कौटुंबिक नितिमुल्यांचा पुरस्कार आणि त्यासाठी पती पत्नीने घराबाहेर पडून पैसा कमावणे यासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या सामाजिक विचारसरणीस सामोरे जाणारे बालमानस नात्यांच्या आंतरिक जिव्हाळयास दुरावणार नाहीतर नवलच समजावे. बालकाच्या व्यक्तीभिन्नतेचा मनस्वी स्वीकार करून, सुजाण संगोपन, प्रगल्भ पालकत्व, जबाबदार पालक वर्तन आदि सप्रात्यक्षिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या पाठशाळा अद्याप तरी उपलब्ध नाहीत. सक्षम पालकत्वाच्या अनौपचारिक शिक्षणाची खरी भिस्त सध्यातरी घरातील जेष्ठ मंडळी, काही कार्यशाळा, शाळेतील शिक्षकांकडून मिळणारे उणेपुरे मार्गदर्शन, वृत्तपत्रे, मासिकांमधील वैचारिक लेख, समाज सेवी संस्था, टीव्ही आणि हल्लीचा सोशल मिडिया इत्यादीवरच अवलंबून असल्याचे पहावयास मिळते. पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे विशेषतः ख्रिश्चन समाजात रूढ असलेली विवाहपूर्व समुपदेशनाची पाळेमुळे अद्यापही म्हणावी तशी विवाहेछुक तरुण तरुणींमध्ये रुजलेली  नाहीत. आज कायद्याच्या चौकटी तोडून मुले जन्माला घालण्यावरुन देखील जाहीररीत्या धार्मिक आणि राजकीय वक्तव्ये कानी येतात. संघर्ष पेटतात. त्यांचे चार चार चालतात तर मग आमचेच ‘’हम दो हमारे दो’’ असे का ? यासारख्या अनेक प्रश्नांवर हुज्जत पहावयास मिळते. अजूनही उपरोधाने '' मुले म्हणजे देवा घरची फुले ''किंवा '' अल्लाह कि देन '' मानून फक्त शरीरधर्माचं पालन पालकांकडून होते मात्र सुह्र्द संगोपनाचं काय ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
    मुल होण्याबाबत प्रत्येक पालकाचे अनुभव भिन्न असतात. काहींना सहज सुलभ झाडावर पाने, फुले, फळे लागावीत तसे काहीसे सोप्पे सुलभ असते. काहींना कित्येक नवस सायास करावे लागतात. प्रत्यक्ष जन्माच्या वेळी अनेकांना ‘ देव पाण्यात घालण्याची वेळ येते’, काहींच्या नशिबी बायोलॉजीकल पॅरेंटींग नसतेच मग दत्तक मुल घेण्याचा मार्ग अवलंबिला जातो. दिग्गज अभिनेते/ अभिनेत्रीदेखील व्यावसायिकता जपत हा मार्ग स्वतःहून स्वीकारतात. मुल हा जिव्हाळ्याचा हळवा कोपरा तर कधी काळजाचा तुकडा, कधी म्हातारपणाची काठी तर कधी वंशाचा दिवा / पणती ठरतो. अनेकांच्या लेखी ते परिपूर्ण स्त्री वा पौरुषत्व सिद्ध करण्याचं लक्षणही मानले जाते. पहिलं अपत्य पदार्पणातच संपूर्ण घरावर कब्जा मिळवते. ‘एकसे भले दो’ म्हणत दुसऱ्याचीही वर्णी लागते. बहुदा मुल प्राप्तीच्या धडपडीवरसुद्धा त्याची मौलिकता ठरत जाते. ते होईपर्यंतची उत्सुकता, काळजी, आनंद, जल्लोष असं सगळ वातावरण असतं. पहिल्या दोन तीन वर्षांपर्यंतचा प्रवास एक आनंदाची पर्वणीच असते. जणू काही सगळं घरच तान्हुलेपण अनुभवतं. आई बाबा, ताई दादा, आजी आजोबा, काका काकू, आत्या, मामा मावशी, अशा नात्याची गुंफण स्पर्शातून, कायिक वाचिक संपर्कातून आणि आंतरिक मायेपोटी जुळणे आवश्यक ठरते. तसे न झाल्यास नात्यांच्या एका अनामिक पोकळीस सुरुवात होते. शैशवास्थेच्या या नाजूक कालखंडातच चांगल्या, मध्यम वा निकृष्ट दर्जाच्या पालकत्वाची बीजे आपल्यात रुजलेली असतात. मूल मोठ होऊ लागतं. इथे पालक म्हणून आपली आणि घरातील सर्वांची सामुहिक भूमिका रोपट्या भोवती असलेल्या गोलाकार मातीच्या आळ्यासारखी असावी. बाह्य जगताकडून केलेले ‘सुकृत संचित’ हळूवार रोपाच्या पानोपानी पोहचविणारी, रुजविणारी, पोषक, आश्वासक आणि बेमालूमपणे त्याच्या तजेलदारपणात प्रतिबिंबित होणारी. त्या भूमिकेस मायेचा भरपूर ओलावा असावा.      
         मुलाच्या जन्मापासूनच मुलगा मुलगी, धाकटा मोठा, हुशार साधारण, शांत खोडकर, उपद्व्यापी  एकलकोंडा, समंजस आडदांड, कामाचा बिनकामाचा अशी असंख्य लेबल्स नकळतच आपण मुलांना चिटकवितो. त्यांच्या जोडीला पिढीजात आलेली दिवेलागणीची शुभंकरोति, रामरक्षा, मनाचे श्लोक, गीतापठण यातले काही समजो न समजो घोकंपट्टीने रटवून घेतले जाते. अगदी सकाळी उठताच क्षणी कराग्रे वसते लक्ष्मी, अंघोळीच्या वेळी गंगेच यमुनेचैव पासून जेवताना वदनी कवळ घेता आणि तत् पश्चात झोपताना अहिल्या,द्रौपदी सीता,तारा,मंदोदरी तथा...असा सगळा दिनक्रम आखून आपण ठरविलेल्या साच्यात त्याचं बाल्य ओतत जातो. थोडक्यात संस्कारित करतो. अशा जुजबी बौद्धिकावर हळुवार नात्यांची बडबडगीते, संस्कारक्षम गोष्टी, नातलगांच्या प्रत्यक्ष भेटीतून लावला जाणारा लळा, किमान घरगुती सख्खी नातीगोती भावनिक पातळीवर रुजविली जाणे इतकी उद्दिष्टपूर्ती सर्वत्र हासिल केली जाते. मुल शाळेची पायरी चढून वर्गमित्र, शिक्षक, शालेय आणि सह शालेय उपक्रमांतून इतर पालक व समाजात रुळू लागतं. जमेल तसतशी बक्षीसं मिळवतं. लाड, प्रेम, कौतुकाचा वर्षाव होतो. घरात कौटुंबिक / अनौपचारिक  तर बाहेर शालेय / औपचारिक शिक्षणाचे धडे गिरवू लागते. खाण्यापिण्याचे, वागण्याबोलण्याचे घरातले नियम आणि बाहेरचे आचारविचार यातील तफावत स्वानुभवातून आत्मसात करु लागते. प्रत्येक मुल शैशवावस्था ते कौमार्याच्या उंबरठ्यापर्यंत अनेक बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक आंदोलने पचवून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व घरात आणि बाहेर निर्माण करू पाहते. झालेले संस्कार, पाठ्यपुस्तकी भाषा, शिक्षण आणि आदर्शांचा वास्तवाशी ताळमेळ स्वतःच्या बुद्धीने तपासू लागते. आणि सामाजिकीकरणाचा एक टप्पा गाठला जातो. पुढेमागे बाहेरची संगत, विविध प्रभाव, आणि तत्सम संस्कारात भलेबुरे व्यक्तिमत्व घडत जाते. करिअरचा टप्पा येतो. तारुण्य सुलभ आपल्या जोडीदाराबद्दल निर्णय घेऊ पाहते. मुलाचा बाप होतो आणि मुलीची आई बनते. एकंदरीत बालक ते पालक असा त्याचा प्रवास आपल्याच नजरेच्या टप्प्यात पूर्ण होतो. नंतरच्या काळात मुलांसाठी सोसलेल्या हालअपेष्टा, केलेले त्याग, परिस्थितीशी घेतलेली टक्कर असे मापदंड लावून आपण जे केले ते कसे योग्यच होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागतो.
    मग आपली पिढी आजी आजोबाच्या भूमिकेत दिसू लागते. ‘’आमच्या वेळीने... सुरु होणारी विधाने आपण जमेल तिथे पेरत जातो. आधी आपल्या मुलांवर गाजविलेल्या हक्काच्या कोशातून बाहेर येत ते कमवते झाल्यावर शिस्तीची शिलाई काहीशी सैल होऊन नातवंडांच्या संस्कारांचे लगाम हाती पडतील तसे घेत जातो. आपणही काहीसे थकलेलो असतो, परावलंबित्वाची जाण होते. मोस्टली आता सूत्रे सुनेच्या हाती एकवटलेली असतात. दरम्यानच्या काळात घरातील सुखदुखा:चे अनेक क्षण येतात जातात. लग्न कार्ये, सणवार,आर्थिक अडी अडचणी, कौटुंबिक व्यवहार, देणीघेणी, मानपान, आपापसातील हेवेदावे, जवळच्या व्यक्तीचे निधन, अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या, वडिलोपार्जित संपत्तीचे आणि भाऊबंदकीचे वाद, घर आणि शेतीच्या वाटण्या ,कुणीतरी केलेला घोर अपमान, पुरविलेले लाड किंवा लावलेला जीव अशा अगणित बालपणीच्या घटना यांच्या अनुभवांच्या आधारे नात्याचा चांगला वाईट गोफ प्रत्येका भोवती विणला जातो. या सर्वांतून मुल शालेय शिक्षणासोबतच नात्यांचीही मुळाक्षरे गिरवीतच जाते. आपले मूल ते त्याचे मुल असा आपलाही पालकत्वाचा संक्रमण काळ आपण यथा शक्ती निभावून ‘महापालक’ बनतो - पुढील सूत्रे परमेश्वरी इच्छा आणि नियतीच्या हाती सोपवून.     
        टिपिकल धाटणीतील मध्यम वर्गीय मराठी बाजाची ही झाली ‘’ पालकत्वाच्या साठा उत्तरांची सुफळ संपूर्ण कहाणी.’’ साधारणपणे कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके, चित्रपट यातून अनेकदा अनेकांनी अनुभवलेली. आता काळ बदलला आहे त्याही पेक्षा माणसे आणि त्यांचे विचारही. आज २१ व्या शतकाच्या प्रारंभी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समुपदेशनातून हाती येत असलेले वास्तव पाहता खरे धोक्यात आले आहेत ते म्हणजे पालक. शिक्षण आणि कौटुंबिक नातेसंबंधाना प्रचंड मोठा हादरा देणाऱ्या समस्यांच्या विळखा पडलेला आहे. त्यांच्या नव्या जुन्या समस्यांच्या यादीत अनेक पालकांना ऐकूनही माहित नसलेल्या शब्दांची भर पडली आहे. शाळकरी वयापासूनच मुलांचे नाते आता TV, कार्टून्सच्या पलीकडे जाऊन whatsapp, facebook, instagram, hike,Yutube, 3G / 4G च्या भरमसाठ वेगाशी जोडले जाऊन ब्ल्यू व्हेल, पोर्नोग्राफी, डेटिंग साईट्स आणि आभासी वार्तालाप या ओंगळ सोशल मिडिया संस्कृतीचा शिकार होत आहे. यात मुठभर असले तरी ते ढीगभरांना आकृष्ठ करीत आहेत. ते थांबवणे आता बालक-पालकांच्या आवाक्या बाहेरचे ठरत आहे. किंबहुना पालकांचा प्रचंड मोठा वर्ग याच्या सर्रास आहारी गेला आहे. एकटेपणा वा नैराश्य घालविण्यासाठी त्यांना कचकड्याच्या नात्याचा आधार वाटेनासा झाला आहे.  म्हणून तंबाखू, गुटका, सिगारेट्स, दारू, व्हाईटनर, या व्यसनांच्या पुढची पायरी म्हणजे अमली पदार्थ - एम डी, ड्रग्ज, अफिन, हुक्का पार्लर, रेव्ह पार्ट्या, उथळ प्रेमप्रकरणे आणि विकृत लैंगिक वर्तन अशा अगणित कुबड्यांचा आधार ते शोधू पहात आहेत. हे झाले काहीसे वैयक्तिक पातळीवरचे. प्रमाण कमी असले तरी याही पुढे जावून अल्पवयीन असल्या कारणाने सामुहिक हिंसा, गुन्हेगारी वर्तन, चोऱ्या, ब्लॅकमेलिंग, गुंडगिरी, रॅगिंग, लिव्ह इन रिलेशनशिप, पक्षीय राजकारण्यांच्या विघातक कृत्यांचा ते भाग बनत आहेत. यातील प्रत्येक समस्या ही फक्त समस्या नसून पालकत्वासमोरील तगडी आव्हाने आहेत.
   नाती जपून ठेवताना हवी समर्थ पालकनीती :
       बालक आणि पालक यांच्यातील सुसंवादाच्या अभावाबद्दल आजही कितीतरी लिहीलं बोललं जाते. सुजाण पालकत्वावरील कार्यशाळांमधून व्यक्त होते ती पालकांची हताशा, गोंधळलेली मनस्थिती, आणि आता सगळं संपल्यात जमा असे व्याकूळ भाव असतात.. अजूनही '' नाहीरे उजाडत '' अशीच परिस्थिती आहे. या उलटपक्षी समुपदेशनातून आढळते ती घराघरांतून होणारी मुलांची मानसिक कुचंबणा, छळ, निर्भत्सना, उपेक्षा आणि पालकांची सदोष वागवणूक. पालकांप्रमाणे मुलांच्याही काही माफक अपेक्षा असतात. तू असे का वागतोस ? या प्रश्नालाही मिळतात हृदयस्पर्शी उत्तरे. घरातून न मिळणारे ममत्व, नात्यातील ओल ते बाहेर शोधू लागतात. कचकड्याच्या नात्यांचाही फियास्को होऊन बसतो. माणसे आणि नात्यांच्या तुटवडयात जे हवे ते कुठेही न मिळाल्यास त्यांच्या भाषेत मेंदूचा चक्का जाम होतो. मग खुले होतात अनियंत्रित वेगाचे भरमसाट मार्ग, जिथे सगळेच भान हरपते. याला थांबवण्यासाठी पालक म्हणून  हवी स्वतःला बदलण्याची, संतुलित राखण्याची आणि सुसंवादाची कला. हे असल्यास/ नसल्यास एकतर नाती घट्ट होतात नाहीतर बिघडतात. या बर्या वाईट नात्यांच्या गुंत्यांचा थेट शिक्षणावर परिणाम होतो. अशा वेळी नेमकं काय करावं यासाठी ही पालकनीती :-
@ वेळेवर दया गुणात्मक वेळ :- मुलांना हवाय पालकांचा दर्जेदार वेळ. पालकसभा, शिस्त मोडल्यामुळे शाळेचे बोलावणे आल्यावर, परीक्षेच्या सुरवातीस, आजारपणात, मोठ्ठं यश किंवा अपयश, त्यांचे वाढ दिवस, अभ्यास, मनोरंजन, शाळेचे स्नेहसंमेलन यात मुलांना आई किंवा बाबा सोबत हवेच असतात. वेळ देणे वा तो काढणे हे कसब जमायलाच हवे. वेळच नाहीचा टाळ कुटणे म्हणजे मूल हातचे गमावणेच होय. आपण या वेळा पाळल्या कि आपला लळाही लागलाच समजा. पुढील बाबींना वेळ देणे हा पालकांसाठीचा गृहपाठच समजावा.     
@ सुरक्षा कवच बना :- मूल छोटे असो वा मोठे ते पालकांकडून अपेक्षा करते ती आधार आणि आश्वासक सुरक्षेची. काहीही झालेतरी ‘’तू आमचा आहेस, कधीच घाबरू नकोस, तुझ्या यश अपयशात, चांगल्या आणि वाईट काळात, घरातल्या आणि बाहेरच्या संकटात आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. तू फक्त समजून उमजून चांगले वागण्याचा प्रयत्न करत राहा. काहीही झाले तरी आम्हाला मन मोकळेपणाने खरं सांगायला अजिबात उशीर करू नको. आमच्याकडून मिळाली तर तुला शिक्षा नसून फक्त सुरक्षा आणि समजूतदारीच असेल, अशी फक्त उक्ती नको तर कृती हवी. चांगल्या वाईट स्पर्शांची जाणीव समजवून देणे, जवळच्याच नात्यातील कोणी वाईट स्पर्श करत नाहीना, आपलं मुल एखाद्या विशिष्ट व्यक्ती, ठिकाण,किंवा प्रसंगाला धास्तावत तर नाहीना, मित्र मैत्रिणीच्या ऐकीव कहाण्या कशा प्रकारच्या आहेत, शाळा, घर, परिसर, नातेवाईकांची ठिकाणे यातील व्यक्तींबाबत ते काय मत मांडते या सर्व नाजूक बाबींकडे दुर्लक्ष नको. शेजारची मुले मुली, कुटुंब, लोकवस्ती एकूण वातावरण कोणत्या प्रकारचे आहे ही चिंतास्थळे पालकांनी वेळोवेळी पारखण्याचे सध्याचे दिवस आहेत. उदाहरणच द्यायचं झाल्यास ‘’ तारक मेहता का उलटा चष्मा ” मालिकेतील टप्पूसेना आणि तिचा समस्त पालक वर्ग नजरेसमोर आणूया.
@ शाळेच्या भानगडींमध्ये हवा IQ,EQ,SQ चा प्राधान्यक्रम :-  वयवर्ष साडेतीन पासून पुढे शाळा आणि शिक्षणाचा कडूगोड टप्पा सुरु होतो. पालक म्हणून आपल्याही दरवर्षी परीक्षा चालू होतात. आपण ‘मार्क्सवादी’ बनून मुलाचे वय वजन उंचीची मापं वापरून तुलना करू लागतो. कायद्याने शिक्षकांच्या हातातील छडी काढून घेतल्याने आणि अशैक्षणिक कामकाजात वेळ जाण्याने अभ्यास आणि शिस्त/ वळण लावणे या बाबींचा बराचसा ताण पालकांवर पडत आहे. शिक्षकांना विश्वासात घेऊन योग्य समन्वय साधने, पालक सभांमध्ये संपर्कात राहून प्रगतीची चाचपणी करणे हेही त्यात येते. बुद्ध्यांकाप्रमाणेच भावनांक व निकोप सामाजिकीकरणाला चढत्या क्रमाने महत्व देणे जमवावे लागते. मार्क्स कमी मिळाले तरी स्वीकार आणि आपलेपणा हवा. त्रागा, मारझोड, शारीरिक मानसिक शिक्षा दडपण तर मुळीच नको. कारणांचा शोध जरूर घ्या पण त्याची रुची, क्षमता, छंद, आवडीनिवडीचे जिव्हाळ्याचे विषय यात स्वातंत्र्य, पाठींबा, प्रबलन देणे ही सूज्ञता मुलांच्या यशाचा कणा बनते. हे शैक्षणिक पालकत्व त्यांच्या वयाचा बावीशी तेविशी पर्यंत आणि आपल्या पन्नाशीच्या जवळपास सातत्याने चालूच राहते. याकाळात सकस पालकत्वाचं रसायन हेच मुलांच्या करिअर आणि व्यक्तिमत्व विकासाचे शुद्ध इंधन ठरते.     
@ अति लाड, प्रलोभने नकोच पण भरपूर प्रोत्साहन :- प्रोत्साहन हा मुलांच्या सुदृढ मानसिक आरोग्याचा ऑक्सिजन आहे. चांगल्या गोष्टींचा घरभर आनंद होणे, शाबासकी मिळणे, त्यानिमित्ताने आईने घरीच त्यांच्या आवडीचे गोडधोड पदार्थ बनविणे यात मुलांना अपरिमित आनंद मिळतो. लाड करताना त्याचा मनाला, बुद्धीला, विचारांना कि शरीराला फायदा होईल याचा विचार व्हावा. मागितलं कि दिलंच यात असे न करता आवश्यक तेच योग्य वेळी पुरविण्याचे सूत्र फार महत्वाचे. काटकसर, संयम, वस्तूचे मोल, त्यासाठी घरातल्यांनी केलेली खर्चाची पारदर्शक तडजोड / जुळवाजुळव तरीही ती वस्तू स्वाधीन करतानाचे दिलखुलास प्रसन्न हसू मुलांना खुप काही शिकवून जाते. ती वस्तू आण तुझी गरज दोन्ही बरोबरच होते आणि मिळवताना सगळेच घर कसे एखाद्या क्रिकेट टीम सारखे झटले, हा फील आणता आला म्हणजे भविष्यात आम्ही तुमच्यासाठी किती पोटाला चिमटे काढले, असे टोमणे मारण्याची गरज संपते. आधीच्या वस्तूंचा तू खरच चांगला उपयोग केलास. I am proud of my dear Beta!  Really you are unique chap!  ही साखर पेरणी बापाने करून अलगद डोक्यावरून हात फिरला कि बाळ स्वतःहून कडकडून मिठी मारते हा अनुभव आहे.        
@ कष्ट आणि घरकाम, स्वावलंबनाचे श्रमसंस्कार :- दळण नेणे आणणे, भाजी चिरून देणे, आई आजारी पडल्यास सगळ्यांचा चहा नाश्ता बनविणे, आई गावी गेल्यास घर सांभाळणे, डाळभाताचा कुकर लावणे, कपडे धुणे, मशीनला लावणे / धुने, घरातील पसारा आवरणे, वेळेवर आजी आजोबांना औषधे देणे, डॉक्टरकडे नेणे, त्याच्याशी शाळा कॉलेजच्या गमती शेअर करणे, लहानांचा अभ्यास / पाठांतर घेणे अशी, पाहुण्यांना नेआण करणे, छोट्यांची काळजी घेणे, आजी आजोबांनी हाक मारताच ओ म्हणणे, किराणा  सामानाची यादी / खरेदी करणे अशी असंख्य कामे वा बाबी घरातल्या तिन्ही पिढ्यांची मजबूत सांधमोड करते. तरुणांवर विश्वास आणि ‘’ आईपेक्षा ताई छानच पोहे बनवते’’ असे चेरी ओंन द केक पालकांनी केल्यास मुलांमध्ये कमालीचा उत्साह संचारतो शिवाय चालत आलेल्या चालीरीती पुढे सरकू लागतात. त्याच्याही भावी संसाराची जडणघडण होऊ लागते.
@ सणवार- सुट्ट्यांचा मस्त मेळ घाला :- गौरी गणपती, दिवाळी, नाताळ, आणि उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे नात्याच्या अभेद्य भुईकोट किल्ला उभारणीचा काळ समजायला हरकत नाही. एकतर आपण जावे किंवा त्यांना बोलवावे, सणांचा खर्च वाटून घेण्याची पद्धत सुरु केल्यास दुमत राहत नाही. थोडा त्रास होईल पण त्यातून सणवारांचा खरा हेतू तर साध्य होतो शिवाय मुलांची वैचारिक, शैक्षणिक, कौटुंबिक, भावनिक, भौगोलिक, सामाजिक अशा विविधांगांचे भक्कम बुरुज उभे राहू लागतात. आपली भावंडे कसा अभ्यास करतात, काय बनण्याचे स्वप्न पाहतात, कसे वागतात बोलतात, आपण कसे वागावे, काय करू नये, अशी सकस स्पर्धा लागते, पालकांनी तसे विषय देवून त्यांची चर्चा घडवून आणावी. थोडे नियोजन आणि प्रवासाची तयारी केली कि हा मस्त बेत जमतो.
@ कोड्ग्यांचे पालकत्व :- ह्या गटातली पालक मंडळी प्रचंड वैतागलेली असतात. जन्माला घालून पस्तावलेली. कोडग्या मुलांच्या शेजारचे, शाळेतले, वर्गातले या सगळ्यांचे सतत तक्रारी करत असतात. वारंवार शाळेत बोलावले जाते. वर्गात कमी आणि बाहेर जास्त. अशा कोडगेपणात गेलेले मुल आणि पालक यांच्यात कमालीचा संघर्ष, नात्यातील कोरडेपणा, एकमेकांना संपविण्याचे भाष्य, रिमांड होमच्या धमक्या, याला कितीपण चोपून काढा अशी शिक्षकांना दिलेली सरल सवलत. दुर्दैवाने आपण कोणीच त्यांना नीट समजून घेतलेले नसते. या मुलांमध्ये भविष्यातील अनेक दिग्गज दडलेले होते हे समस्त समाजाला फार उशिरा उमजते. काही प्रमाणात या मुलांमध्ये अतिचंचलता, भूक, कानफाट्या असे पडलेले नाव आणि बऱ्याच अंशी बिनकामाचा, अनेक प्राणिज उपमांचे स्वामित्व, अनेकांनी नाकारलेपण, आणि प्रेमाचा अभाव असतो. यांना गरज असते उलट्या चष्म्यातून पाहण्याची, यांच्यातील प्रचंड उर्जेला नेमकी दिशा देण्याची. यासाठी गरज असते ती शिक्षक, पालक, समुपदेशक आणि ते मुल यांच्यातील अनोख्या प्रायोगिक पालकत्वाची. ‘’तारे जमीन पर ‘’ च्या जवळपास जाणारी.   
@ विशेष बालकांचे पालकत्व :- एका हळव्या दिशेला आढळणारे ही बालक पालकांची व्यथा शासकीय  पातळीवरून आता संवेदनशीलतेने हाताळली जात आहे. या पालकांच्या सहिष्णूतेला अनन्य साधारण महत्व आहे. तथापि शारीरिक अपंगत्वाची उणीव भरून काढत अनेक प्रेरक कथांची मालिका येथेही पहावयास मिळते आहे. शासनाच्या मदतीचा हात आणि उंचावत जाणारे मनोधैर्य याच्या जोरावर ह्या बालक पालकांची कामगिरी आदर, अभिमान, बोधपर आणि आदर्शांची मानकरी ठरत आहे.      
@ जेष्ठांचे पालकत्व :- आपले पालकत्व ज्यांनी केले त्याची जबादारी आज आपल्यावर असते. जेष्ठ मंडळी हा आपल्या कौटुंबिक इतिहासाचा मोठा ठेवा आहे. वार्धक्य ही अटळ बाब आहे. त्यांना ती सुसह्य होण्यासाठी आणि आपल्या पाल्यांना पालकत्वाचा वस्तूपाठ घालून देण्यासाठी आपणही सक्षमपणे जेष्ठांचे पालकत्व स्वीकारणे आवश्यक असते. Child is father of man अस इंग्रजीत म्हटले जाते. पालकत्वाचे हे बाळकडू आपणच त्यांच्यापर्यंत पोहचविणे आपल्या संस्कारांचाच भाग आहे.  हा शैक्षणिक संस्कारांच्या तीन पिढ्यांचा गोफ सुगरणीच्या घरटयासारखा विणण्यासाठी आपले पालक, आपण आणि आपली मूले या सर्वांनी योगदान द्यावे. याचे लोकप्रिय उदाहरण म्हणजे ‘’ श्रीयुत गंगाधर टिपरे ‘’ ही मराठी मालिका.
@ काही डोंट्स :- पालक म्हणून काही पथ्यांची मालिका अर्थात नकोशा बाबी पाहणे म्हणजे या घरट्याची वीण जपण्यासारखे आहे. सतत तुलना, अविश्वास, शंका घेणे, पाळत ठेवणे, शब्दाशब्दाला चुकाच दाखविणे, मुलगा मुलगी भेद्निती बाळगणे, स्वतः व्यसने करणे, मोबाईल्सच्या आहारी जाणे, विकृत लैंगिक वर्तन करणे, अवास्तव धार्मिकता, पोथिनिष्ट विचारसरणी, अति राजकीय / अध्यात्मिक प्रभावाखाली राहणे, मुलांच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणे, बेदम मारहाण, करडी शिस्त, आर्थिक अडचणी सांगणे, ओरडून बोलणे, वादग्रस्त विषय चघळत बसने, व्यभिचार करणे यासारख्या गोष्टी मुलांचे भावविश्व करपून टाकतात. ते कटाक्षाने टाळणे हेच आदर्श पालकत्व होय.  
@ समुपदेशक आणि वैद्यकीय सल्ला आहेच :-  सर्वच प्रयत्न करूनही शारीरिक, मानसिक  भावनिक गुंता हाताबाहेर जात आहे असे लक्षात आल्यास वेळीच समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ आहेतच. अगदी शेवटच्या टप्प्यावरच ही भेट घ्यावी असेही मुळीच नाही. हुशारानाही ही गरज लागू शकते. स्पर्धा, भयगंड, औदासिन्य, ताणतणाव, वैफल्य, विवशता, अपघात यासारख्या बाबींमध्ये समुपदेशनादी वैद्यकीय उपचार पद्धतींचा निश्चित फायदा होतो.

           सरते शेवटी अग्रगण्य बाल मनोविश्लेषक मेलिनी क्लाईन (१८८२ ते १९३०) असे म्हणतात कि ‘’ प्रौढावस्थेत माणसे जे वर्तन करतात त्याचे मूळ त्यांना अर्भकावस्थेत आलेल्या कौटुंबिक अनुभवात दडलेले असते. जर एखाद्या व्यक्तीस अर्भकावस्थेत पालकांकडून दुर्लक्ष्य अथवा छळ तिला आलेला अनुभव तिच्या अप्रकट मनात वस्तूंच्या अथवा प्रतिमांच्या रुपात ठसला जातो. पुढे इतरांशी संबंध ठेवताना या ठशांना अनुसरून ते ठेवले जातात.’’ मेलिनी यांचा हा वस्तू - आंतर्क्रिया सिद्धांत ( Object  Relations Theory ) आजच्या बालक पालकांना सुजाण आणि सुहृद पालकत्वाचा गुरुमंत्र ठरतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तिन्ही सांजेला कविता

गुरुजनहो गतिमान होऊया !