संधीप्रकाशात

                                                               संधीप्रकाशात 
             आज १ जानेवारी २०१८, नवीन वर्षाची  नवी सुरुवात. नवीन वर्षात म्हणे लोक बरेच काही संकल्प करतात. हे लिखाण म्हणजे माझा संकल्प वगैरे अस काहीच नाही. पण डोक्यात साचलेले  बरेच काही डिलीट करण्यापूर्वी  जमेल तेवढं आपलसं वाटणारं बाजूला काढून मग कचरा निर्मुलन करावं म्हटल. वेळ मिळेल तसतसं. तसा मी लेखक, कवी,फार मोठा वलयांकित व्यक्ती अथवा उत्तम ब्लॉगर्स पैकी मुळीच कोणीही नाही. वाचनाचीही तशी जुजबी आवड. हल्ली हल्ली या संगणकावर ब्लॉग लिहून आपल्याच दुनियेतील जगभर विखुरलेल्या लोकांपर्यंत पोहचता येत, भावलेलं मांडता येत, आणि आजची गरज म्हणजे शेअर करता येत म्हणून केलेला उपद्व्यापच, बघावं म्ह्टल करून. यात विषयांची सरमिसळ नक्कीच होणार. वर्तमानाची नाडी पकडून लिखाणाच्या गोफणीतला  विषयाचा दगड कधीही भूतकाळात भिरकावला जावू शकतो. मूळ पिंड शिक्षकाचा असला तरी काही गोष्टी  उलट्या चष्म्यातून पाहण्याची अंगवळणी पडलेली सवय मात्र त्याला धरून असेलच अस अजिबात नाही. खरंतर शाळा, विद्यार्थी, अभ्यास, गृहपाठ, शालेय उपक्रम, पालक, सहकारी शिक्षक, मित्र, शिकणे आणि  शिकविणे  या सगळ्यांशी आता तब्बल  वीस  वर्षांच नातं घट्ट झालय. शिक्षक आणि समुपदेशक म्हणूनही जमेस असलेले बरेच भक्कम अनुभव कुठेतरी मनात सारखे रुंजी घालत असतात. काही भावलेली माणसे, ठिकाणे, किस्से तर काही भाव खावून गेलेल्या असंख्य घटनांच नेमकं काय करावं असा अनेकदा विचार  आला. शिक्षकी पेशा, मुळचा मुंबईकर नसलो तरी तीच कर्म पंढरी म्हणून मुंबईशी पुरती जोडलेली नाळ, इथल्याच मातीतला जडणघडणीचा काळ, पायावर उभं राहणे, आणि त्यासाठी केलेला खटाटोप, चांगले वाईट अनुभव, एका गोंडस लेकीच पालकत्व बारा वर्षात बरच काही शिकवून गेलंय.
                     आठवेल ते शब्दबद्ध करण्यासाठी, वाटेल ते बोलून मोकळे होण्यासाठी, नव्या जनरेशनला  माझ्या क्षितिजावर आणण्यासाठी , एका भासमान पोकळीकडे आपलं संचित म्हणून पाहण्यासाठी, तिला भरीव करण्यासाठी, त्या पोकळीतील नाविन्य जाणून घेण्यासाठी, नव्हेतर नवीन जगण्यासाठी आणि अगदी खरखर सांगायचं तर जे दूरवर आहे, स्पष्ट दिसतय पण तिथे गेलं कि पुन्हा कुठेतरीच लांबवर जमिनीला टेकलेलं शोधण्यासाठीच हे " माझं क्षितीज. "  

टिप्पण्या

  1. शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवण्यासाठी या ज्ञानाचा नक्कीच ऊपयोग होईल आणि तूम्ही तो करत आहात च .. show must go ON

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी आणि मुंबई मराठी पत्रकार संघ

गुरुजनहो गतिमान होऊया !

करीयरची सप्तपदी